Ad will apear here
Next
‘दिवाळी म्हणजे सर्जनशीलता’


‘दिवाळी म्हणजे सर्जनशीलता. दिवाळी आणि घरी केलेला आकाशकंदील हे एक नातंच आहे डोळ्यात. शिवाय चुलीचा धूर.. तो तेलकट वास... फळीवरचे ते फराळाने भरलेले पितळी डबे... भरपूर पदार्थ खाऊन खाऊन झालेला खोकला..., चमनचिडी नावाचा फटाका आणि दिवाळी अंक... लहानपणची दिवाळी सुंदर होती...’ सांगत आहेत ज्येष्ठ कलावंत माधव वझे.... ‘आठवणीतली दिवाळी’ या सदरात...
.................

माधव वझेपुण्यातल्या शनिवारवाड्यासमोर आमचा वझे वाडा होता. एकत्र कुटुंब असल्यानं दिवाळीला भरपूर माणसं घरात असायची. दिवाळी आली, की आमच्या आनंदाला भरतं यायचं. दिवाळी जवळ आली, की पहिले वेध लागायचे ते आकाशकंदील करण्याचे! वडिलांबरोबर बाहेर जायचं आणि काठ्या, रंगीबेरंगी कागद आणायचे. मग दोरे, डिंक वगैरे तयारी करायची. मग काठ्या आणि कागद व्यवस्थित आकारात कापायचे... डिंक लावून चिकटवून कंदील बनला आणि आपल्या गॅलरीत टांगला, की जे काही समाधान मिळायचं ते शब्दातीत. तो एक कंदील बनवण्यसाठी भावंडांमध्ये हमरीतुमरी व्हायची - कंदील बनवल्याचं श्रेय कुणी घ्यायचं यावरून! मला आठवतंय त्या सगळ्या भानगडीत माझ्याकडे फक्त डिंक लावण्याचं काम असायचं. आणि मग माझे डिंकाने बरबटलेले हात पाहून वडिलधारे ओरडायचे की साधा डिंकसुद्धा नीट लावता येत नाही म्हणून!
कंदील बनल्यावर मग तो लांब वायरने बाहेर गॅलरीत टांगला आणि त्यातला दिवा लागला की बाहेरून बघितल्यावर तो रंगीबेरंगी कंदील.. त्यातून येणारा प्रकाश पाहिला, की कृतकृत्य वाटायचं. थोडक्यात म्हणजे दिवाळी आणि घरी केलेला आकाशकंदील हे एक नातंच आहे डोळ्यात. आजकालचे रस्त्यावर मिळणारे एकसारखे कंदील नकोच वाटतात. त्यात आपलं काही नसतं. आणि आजकालच्या दिवाळीत ते घरचे आकाशकंदील हरवल्याचं जाणवतं.

दुसरी आठवण म्हणजे दिवाळीनिमित्त घरात केले जाणारे पदार्थ. चिवडा, चकली, लाडू, शेव, अनारसे यांची मजाच वेगळी असायची. चुलीचा धूर.. तो तेलकट वास... फळीवरचे ते फराळाने भरलेले पितळी डबे... आणि भरपूर पदार्थ खाऊन खाऊन झालेला खोकला... घरी केलेले पदार्थ हे वैशिष्ट्य आता हरवत चाललंय...

दिवाळीच्या पहिल्या दिवशी नरकचतुर्दशीला आम्हाला पहाटे चार साडेचारलाच उठवलं जायचं.. आणि मग उटणं लावून गरम पाण्याने केलेल्या आंघोळी... नंतर केशर घालून सहाणेवर उगाळलेलं गंध लावून छान शिवलेले कपडे घालून तयार होऊन फराळाला बसायचो... सगळ्यांनी तब्येतीत फराळ हाणला, की नंतर त्या तेलकट तुपकट पदार्थांवर उतारा म्हणून दही-पोहेसुद्धा असायचे... नंतर मग फटाके!



शनिवारवाड्यासमोरच्या पटांगणात फटाक्यांची दुकानं असायची. त्या काळी ठराविकच प्रमाणात फटाके दुकानात ठेवायला परवानगी असायची. मग आमच्या ओळखीतला अब्दुल नावाचा दुकानदार जास्तीचे फटाके आमच्या घरी ठेवण्यासाठी द्यायचा आणि त्यातलेच मग आम्हाला उडवायला मिळायचे. लवंगीसर, भुईचक्र, भुइनळे आठवतायत. मोठा फटाका लावून त्यावर कॅप्स्टन सिगारेटचा पत्र्याचा डबा ठेवून त्या स्फोटाबरोबर तो थाडकन उंच उडलेला बघण्यात मजा यायची. चमनचिडी नावाचा फटाका हल्ली बघायला मिळत नाही. ती चमनचिडी सुईsssss करत उडून जायची. ती पण मजा आणायची.

आणि एक महत्त्वाची आठवण म्हणजे दिवाळी अंक!! केसरी, सकाळ, दीपावली, आवाज असे अंक अनेक आठवतायत. ते दिवाळीनंतरसुद्धा बराच काळ पुरायचे...
आजच्या काळातल्या दिवाळीत मात्र आपल्या हातांनी बनवलेलं फार काही दिसत नाही याची खंत वाटते. आपली निर्मिती, आपली सर्जनशीलता आज हरवलेली दिसते. एकत्र कुटुंबं संपली. वाडा संस्कृती संपली, याचंही वाईट वाटतं. त्यामुळे आजकाल जो तो आपापल्या परीने दिवाळीचा आनंद घेत असला, तरी मला आजही आमच्या लहानपणची दिवाळी आठवून ती हरवल्याची भावना मनात येते आणि त्या आठवणीने डोळ्यात एखादा अश्रू उभा राहतो...

(शब्दांकन : प्रसन्न पेठे, व्हिडिओ : स्नेहा कोंडलकर)

(‘आठवणीतली दिवाळी’ या दिवाळी अंकातले सर्व लेख एकत्रितरीत्या येथे उपलब्ध होतील.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZTVBH
Similar Posts
‘दिवाळी अंक म्हणजे दिवाळी’ ‘भाऊबीजेतून मिळालेल्या पैशांतून दिवाळी अंक विकत घेण्यात वेगळीच मजा होती. एकंदरच, सर्व नाती, सर्व कला, निसर्गाचं देखणेपण आणि माणसाचा प्रत्येकाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन या सगळ्याला उजाळा देणारा दिवाळीचा सण त्या वेळी खूप मौलिक होता, असं वाटतं...’ ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले सांगत आहेत त्यांच्या ‘आठवणीतल्या दिवाळी’बद्दल
‘ती दिवाळी मनात पक्की’ ‘तेव्हा दिवाळीत कडाक्याची थंडी असायची. प्रत्येक गोष्टीचं कौतुक होतं. आता ऋतूही बदलले आहेत आणि कपडे, दागिने, वाहने खरेदीचं अप्रूप राहिलेलं नाही पण तरीही ती दिवाळी मराठी माणसाच्या अंतर्मनात पक्की बसलेली आहे...’ सांगत आहेत ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ आणि लेखक डॉ. विश्वास मेहेंदळे .... ‘ आठवणीतली दिवाळी’ या सदरात
‘दिवाळी म्हणजे नात्यांचा उत्सव’ ८८ वर्षांचे चारुदत्त ऊर्फ चारुकाका सरपोतदार म्हणजे पूना गेस्ट हाउसच्या माध्यमातून अनेक कलाकारांशी जिवाभावाचे नाते जोडलेले पुण्यातले बुजुर्ग व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या मते दिवाळी हा नात्यांचा, नाती दृढ करण्याचा उत्सव आहे. त्यांच्या ‘आठवणीतली दिवाळी’ अशी आहे...  ......... खरे तर माझ्या लहानपणी
दिवाळीच्या अविस्मरणीय क्षणांची शिदोरी सध्या रत्नागिरीत असलेल्या आणि पुणे जिल्ह्यातील कराळेवाडीत माहेर असलेल्या रेश्मा मोंडकर (पूर्वाश्रमीच्या संगीता कराळे) यांनी त्यांच्या लहानपणीच्या दिवाळीच्या स्मृतींना दिलेला हा उजाळा...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language